शरद पवारांचे ज्येष्ठत्व राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असे वाटतं : बाळासाहेब थाेरात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत भाष्य करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसतो, असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात यांनी सांगितलं, “राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचे नेतृत्व पक्षाने स्वीकारले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पुन्हा एकत्रित येत आहे. राहुल गांधी यांनी जीवनात जे दुःख पाहिजे, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातून सावरून ते नेतृत्व करत आहेत. शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. परंतु, राहुल गांधी यांना समजून घेण्यात
कमी पडले असे वाटतं.”

तसेच “पुढील काळातही ते समर्थपणे नेतृत्व करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधी जे काम करत आहेत, त्यांच्याविरुद्ध भाजपच्या यंत्रणा कार्यरत असतात,” असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

आघाडी धर्माचे पालन सर्वांनी करावे

शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीवरून महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि महिला व बालविकासमंत्री यांनी म्हटलं की, “आघाडीतील काही नेत्यांच्या मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावे, असे वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचे पालन सर्वांनी करावे. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे,” असे ट्विट त्यांनी केलं होते.