…तर राजू शेट्टी होणार आमदार

पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी तसा प्रस्ताव दिला आहे. याबाबत दोन दिवसात आपण निर्णय घेऊ, असे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टी यांनी भाजपा व मित्र पक्षांच्या सहकार्याने निवडणूक लढवली होती. पण तीन वर्षानंतर त्यांचे भाजपाशी संबंध बिघडले. त्यांनी मोदी-भाजपावर टीकेचा प्रहार सुरू केला. तेव्हापासून ते काहीसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे झुकले होते. मागील लोकसभा निवडणूक त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अपयश आले. लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधान परिषदेतील एखादी जागा मिळावी, असा आग्रह महा विकास आघाडीकडे धरला होता. अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत स्वाभिमानीच्या मागणीकडे दोन्ही काँग्रेसने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे स्वाभिमानी कडून नाराजी व्यक्त केली गेली होती. आता राज्यपाल कोट्यातून काही जागा भरल्या जाणार असून यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची त्यांच्या शिरोळ तालुक्यातील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत शेट्टी म्हणाले, गेली काही दिवस आईची प्रकृती खराब होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी जयंत पाटील घरी आले होते. याच वेळी काही राजकीय चर्चा झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानपरिषदेत राज्यपाल कोट्यातून एक जागा देण्याचे सूतोवाच केले आहे. याबाबत स्वाभिमानीच्या कार्यकारणी चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.