MLC Election Results : ‘… ही तर मतदारांनी आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती होय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती असल्याचा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल खा. सुळे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल 20 वर्षांनंतर भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. नेहमी भाजपला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपच्या गडाला खिंडार पाडले आहे.

यावेळी खा. सुळे म्हणाल्या की, हे यश म्हणजे लोकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नांतून हा विजय साकारला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात 1 लाख 22 हजार 145 अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपच्या संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख 15 हजार मतांचा कोटा निश्चित केला होता.

नागपुरात भाजपच्या गडाला सुरुंग

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपची पीछेहाट आहे. महाविकास आघाडीने भाजपच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदारसंघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

औरंगाबादमध्ये सतीश चव्हाण यांची हॅटट्रिक

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. महाविकास आघाडीचे चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. चव्हाण यांना तब्बल 116638 मते मिळाली आहेत, तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना 58743 मतांवर समाधान मानावे लागले आहे.