माढा मतदारसंघ : स्थानिक नाराज नेत्यांसोबत मुंबईत बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या चर्चेला उधाण आले असताना याच मतदारसंघातील राष्ट्रवादीने मुंबईचे बोलावणे पाठवले आहे. मुंबईत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी नाराज नेत्यांची बैठक घेतली जाणार आहे.

आज बुधवारी सायंकाळी हि बैठक पार पडत असून या मतदारसंघातील नाराज नेत्यांना तसेच विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना हि या बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीला माढ्याचे आमदार बबन शिंदे, माढ्यातून लोकसभेसाठी इच्छुक असणारे निवृत्त भाप्रसे प्रभाकर देशमुख आदी नेत्यांना बैठकीला मुंबईला बोलावण्यात आले आहे.

दरम्यान, काल शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात दिल्लीत गुप्त बैठक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आजची बैठक आयोजित केली असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. २००९ पासून विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतून दुसऱ्या फळीत फेकले गेले आहेत. विजयसिंहांची नाराजी पत्करणे राष्ट्रवादीला कदापी पचणार नाही. म्हणून राष्ट्रवादी शरद पवार यांची उमेदवारी घोषित करण्याआधी सर्व नेत्यांशी बोलून घेत आहे असे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे.