राष्ट्रवादीच्या नेत्याचा PM मोदींना सवाल, म्हणाले – ‘चक्रीवादळानंतर गुजरातचा हवाई दौरा करता मग महाराष्ट्राबाबत भेदभाव का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तोक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. वादळामुळे राज्यात 18 जणांचा मृत्यू, तर 28 जण जखमी झाले आहेत. मुंबई, कोकण किनारपट्टीसह राज्यात 11 हजार ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. तसेच हजारो हेक्टर शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्येही या वादळाने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (दि. 19) गुजरातचा हवाई पाहणी दौरा करत आहेत. त्यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक पंतप्रधान मोदींना रोकडा सवाल केला आहे. महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत, असा सवाल मलिकांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रातही तौक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबद्दल असलेल्या या भेदभावाबद्दल नवाब मलिक यांनी ट्विट करुन प्रश्न उपस्थित केला आहे. चक्रवादळाने महाराष्ट्रात 10 हजार हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले आहे. आतापर्यंत 13 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आधीच कोरोनाचं संकट सहन करणाऱ्या राज्याला आता या वादळाच्या संकटाचाही सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याविषयी विचारणा केली असता, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. त्यामुळे पंतप्रधान फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, याचीही त्यांना खात्री पटली असावी, असे राऊत यांनी म्हटले आहे.