BMC निवडणुकीसाठी NCP ची तयारी, ‘या’ दोन नेत्यांवर सोपवली जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 2022 मध्ये होणा-या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिकेवर भगवा फडकवणारच यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात आता महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसने एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीनेदेखील पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुक लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही जोरदार पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याबद्दलची माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली. मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावरही मलिक यांनी भाष्य केले आहे. निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून अद्याप कोणाचीही निवड झालेली नाही. मात्र सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी लक्ष घातल्यास त्याचा पक्षाला फायदाच होईल, असे मलिक यांनी सांगितले आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे. हे तीन पक्ष सरकारमध्ये एकत्र आहेत. मात्र काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राज्य सरकारमध्ये एकत्र असलेल्या पक्षांनी एकसंध राहायला हवे असे विधान मलिक यांनी केले आहे. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नुकसान झाल होते. त्यांच्या जागा 52 वरून 31 वर आल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे 9 उमेदवार विजयी झाले होते. शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या.