ठाकरे सरकारमध्ये एकनाथ खडसेंना मंत्रीपद मिळणार का ?, छगन भुजबळांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. त्यानंतर चर्चा सुरु झाली आहे ती एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात (minister) स्थान मिळणार का ? खडसे यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांची मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, अशी सध्या चर्चा सुरु आहे. खडसे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील त्यांच्या क्षमतेबाबत कौतुक केलं होतं. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाणार असल्याचे बोललं जात आहे. या सर्व चर्चांवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.

एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल अशी चर्चा आहे, असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले, यावर शरद पवारच बोलू शकतील. मला त्यातलं काही माहित नाही. राष्ट्रवादीत एकनाथ खडसे यांचे स्वागत आहे. आता सर्व ठरलं आहे. त्यामुळे चर्चेचं कारणच नाही असंही भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एखाद्या विद्यमान मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. सध्यातरी राष्ट्रवादीत जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आणि दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांची नाव चर्चेत आहे. एकनाथ खडसेंना कृषीमंत्री बनवण्यात येईल, पण त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत खात्यांची अदलाबदल करावी लागेल. सध्या शिवसेनेचे दादा भुसे हे कृषीमंत्री आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंना हे पद देण्यासाठी त्याबदल्यात शिवसेनेला दुसरं खातं द्याव लागणार आहे.

राजकीय चर्चेनुसार शिवसेना कृषी खात्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खाते घेऊ शकते. त्यामुळे गृहनिर्माण खात्याचे विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप लागले आहेत. त्यामुळे ते वादात सापडले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरुन हटवून पक्षात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल, असं बोललं जात आहे. तर दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीच्या कारणामुळे फारसे सक्रीय नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड किंवा दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांपैकी एकाला राजीनामा द्यावा लागू शकतो.