‘भाजपनंच मेट्रोचा इगो केला’, राष्ट्रवादीचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   आरे येथील कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा दुर्दैवी निर्णय केवळ अहंकारातून झाला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरीक्त भुर्दंड सोसावा लागेल असं याच सरकारनं स्थापन केलेल्या समितीनं सांगितलं. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते ? आणि कशासाठी ? असे प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना उत्तर देत पलटवार केला आहे.

नवाब मलिक म्हणाले, “भाजपच मेट्रो बाबत इगो ठेवून वागला आहे. आघाडी सरकारच्या काळात भाजपनं चारकोपला कारशेडला विरोध केला होता. तो त्यांनी मानखुर्दला हलवला आहे. आरे कारशेडला विरोधक तसेच सत्तेतील मित्र असलेल्या शिवसेनेचंही यांनी ऐकलं नाही. हा इगो नव्हता का ? कांजूरमार्ग बाबत न्यायालयात असलेल्या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गामुळं 8 किमी मधील 5 लाख लोकांना फायदा होणार आहे.” असंही त्यांनी सांगितलं.

“कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारनं विचार केला. परंतु त्यावर उच्च न्यायालयाची स्थगिती होती. काही खासगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला होता. स्थगिती मागे घ्यावी म्हणून विनंती करण्यात आली, तर न्यायालयानं दावे पुढील काळात निकाली निघाले तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितलं. ही रक्कम 2015 मध्ये सुमारे 2400 कोटी रुपयांच्या आसपास होती. आज त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय ? प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं तर विलंबाला जबाबदार कोण ?” असा सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य करत संताप व्यक्त केला होता.