‘राष्ट्रवादी’चे मंत्री नवाब मलिकांच्या ‘नगरसेवक’ भावाची ‘मुजोरी’, कामगाराला ‘मारहाण’ करत ‘धमकी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी काही कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कप्तान मलिक यांनी कुर्लाजवळ असलेल्या चुनाभट्टी भागात रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करत धमकी दिली. कप्तान मलिक यांनी चार कामगारांना मारहाण केली तसेच यापुढे येथे दिसला तर हात-पाय कापून ठेवीन, अशी धमकी दिली. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कुर्ल्याजवळ चुनाभट्टी भागात रस्त्याचे काम सुरु होतं. रस्त्यावर एका ठिकाणी खोदकाम केले होते आणि त्याठिकाणी फायबर केबलचं कामही सुरू होतं. या ठिकाणी कप्तान मलिक यांनी जाऊन कामगारांना वर्क ऑर्डरची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडे वर्क ऑर्डर नसल्याने त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना त्यांनी मारहाण करत धमकी दिल्याचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला.

या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांकडे वर्क ऑर्डर नसल्याने त्यांना मारहाण केलीच शिवाय त्यांना धमकी दिली. जा पोलीस ठाण्यात आणि माझ्या विरोधात तक्रार कर, यापुढे दिसलात तर हात – पाय तोडून टाकू असेही ते म्हणाले. दरम्यान, हा व्हिडीओ एक महिन्यापूर्वीचा असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक कप्तान मलिक यांनी दिलीय. तसेच कामाची कोणतीही परवानगी नसताना त्यांनी काम सुरु केले होते. त्यांच्याकडे मी परवानगी मागितली मात्र त्यांनी दिली नाही. त्यामुळे मला हात उगारावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –