राष्ट्रवादीचं ‘मिशन 2022’ ! पक्ष सोडून गेलेल्यांचा उपयोग नाही, मुंबईत 8 चे 60 नगरसेवक झाले पाहिजेत, अजित पवारांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पक्षाची बदनामी होईल आणि पवार साहेबांना मान खाली घालावी लागेल, असे काम करू नका. आपलं सरकार आलं म्हणून चिकटायला आले तर अशांना जवळ करू नका. दोन वर्षे वाट बघा तो आपल्याबरोबर राहतो की नाही. मुंबईचे नवाब मलिक आणि नरेंद्र वर्मा सोडले तर बाकीचे अध्यक्ष आपल्याला सोडून गेले. त्यांचा काही उपयोग नाही अस सांगत अजित पवार यांनी सचिन अहिर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, संजय पाटील यांना टोला लगावला. तसेच अशी माणसं शोधा जी सरकार असो किंवा नसो सोडून जाणार नाहीत असे अजित पवार यांनी सांगितले.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने मिशन 2022 हाती घेतले आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चुनाभट्टीतील सोमय्या मैदानावर आज दिवसभर कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या एकदिवसीय शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले, मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 नगरसेवक आहेत. येत्या निवडणुकीत ते 60 झाले पाहिजेत अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. मिशन 2022 हे शिवेसना-काँग्रेसला धक्का देण्यासाठी आहे, हा चुकीचा प्रचार केला जात आहे. विरोधी पक्ष आपली महाविकास आघाडी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ही ‘दिवार तुटती क्यू नही’ असं विरोधकांना वाटलं पाहिजे. आपल्याला एकमेकांबद्दल विश्वास वाटला पाहिजे. शिवसेना महापालिकेत एक नंबरला राहिला पाहिजे आणि राष्ट्रवादी दोन नंबरचा पक्ष झाला पाहिजे असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे सध्या 8 नगरसेवक आहेत. ते वाढून 50 ते 60 झाले पाहिजेत. आजवर या महापालिकेत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त 14 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आत्तापासूनच कामाला लागण्याच्या सुचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच वार्डात काम केलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. महिन्याला एक दिवस मुंबईला देणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.