राष्ट्रवादीच्या ‘या’ 2 गायब झालेल्या आमदारांनी सांगितला सुटकेचा ‘थरार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारून भाजपला पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 13 आमदार होते. कालपर्यंत 4 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हते. त्यातील अनिल पाटील, दौलत दरोडा आणि नितीन पवार हे तीन आमदार मुंबईत परतले आहेत. मुंबईत परतल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी ‘दिल्लीहून सुटके’ची माहिती दिली आहे. या आमदारांना हरयाणातील एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवले होते, असा दावा राष्ट्रवादीनं केला आहे.

अजित पवार यांनी आम्हाला फोन केला म्हणून आम्ही गेलो. तेथून आम्हाला थेट दिल्लीला नेण्यात आलं. बाकी आमदारही संध्याकाळपर्यंत येतील असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. हळूहळू आमच्या परिस्थिती लक्षात आली. हॉटेलमध्ये 100 हून जास्त भाजपचे कार्यकर्ते निगराणीसाठी ठेवण्यात आले होते. अखेर आम्ही कसंतरी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला तेथील पक्षाचे कार्यकर्ते तुमची मदत करतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यानंतर ते कार्यकर्ते हॉटेलमध्ये पोहोचले. काही मिनिटांतच त्यांनी आम्हाला बाहेर काढले आणि दिल्लीत आणले. अशी माहिती या आमदारांनी दिली आहे.

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला 145 आमदारांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणखी तीन आमदार परतले आहेत. त्यामुळे अजित पवारांसोबत केवळ एक आमदार राहिला आहे. अशा परिस्थितीत भाजपा 145 चा आकडा कसा गाठणार याची उत्सुक्तता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते म्हणून अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 54 आमदारांचा भाजप सरकारला पाठिंबा आहे, असे पत्र दिल्यानंतर राज्यात भाजप सरकार स्थापन झाले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून काही आमदार राष्ट्रवादीकडे परतले आहेत. तर, भाजप बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Visit : Policenama.com