‘…तर मी राजकीय संन्यास घेईन’, मंत्री दत्तात्रय भरणे यांचं पत्रकार परिषदेत खुलं ‘आव्हान’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – उजनी धरणाच्या पाण्यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने मुद्द्यावरून रान उठवल्यानंतर विविध संघटनांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरुद्ध रान उद्धवण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भरणे यांनी सावधपणे आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, ठरल्याप्रमाणेच उजनीतील पाण्याचे वाटप होईल. इंदापूरला सोलापूरकरांच्या हक्काचे एक थेंबही पाणी नेलं जाणार नाही. तसं झाल्यास मंत्रिपद, आमदारकीच काय, राजकीय संन्यास घेईन, असा खुलासा त्यांनी केला आहे.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीने इंदापूरला देण्यात आले.अशा बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविषयी प्रचंड रोष निर्माण झाला होता. या मुद्द्यावरून भाजपनेही रान उठवले होते. त्यामुळं सर्वपक्षीय नेते, संघटना यांनी मंत्री भरणे यांच्याविरुद्ध आंदोलन छेडले होते. कुठे काळे झेंडे दाखविण्यात आले तर कुठे पालकमंत्री भरणे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरची तिरडी यात्रा काढून पुतळ्याला जलसमाधी देण्यात आली. ही बाब भरणे यांना समजताच त्यांनी सावध पवित्रा घेत आपली बाजू मांडली आहे.

यामुळे आता सोलापूरकरच बुचकळ्यात पडले आहे की उजनीच्या पाण्याचे नक्की गौडबंगाल काय आहे. कारण खोरे निहाय पाणी वाटपाचा निर्णय झाला नाही. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साहाय्याने आमदार भरणे यांनी सांडपाण्याच्या नावाखाली अधिकचे ५ टीएमसी पाणी इंदापूर-बारामती पट्ट्यात नेलं आहे. त्यामुळं मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातील टेलएन्डच्या तालुक्यांना उजनीचे पाणी पूर्ण क्षमतेने कधी मिळणार, याचं खरं उत्तर आता तरी कोणाकडे नाही. दरम्यान, आमदार भरणे यांच्या या खुलाशाची आता पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात उजनीच्या पाणी वाटपाचा प्रश्न उग्र रूप धारण करणार हे नक्की.