राष्ट्रवादीला धक्का ! होय, आमदार तटकरे शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागली असून अनेक विद्यमान आमदार, नेते मंडळी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा-शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादीला धक्का दिला असतानाच राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे आमदार आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं समजतं.

आमदार अवधूत तटकरे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्यात काही वाद असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी अवधूत तटकरे यांच्या लहान भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता. आता अवधूत तटकरे देखील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यातच अवधूत यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी केल्यामुळे या मतदारसंघामध्ये एकाच घरातील दोघांमध्ये लढत होणार असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये सुरु आहे.

अवधूत तटकरे यांना सुनिल तटकरे यांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखले जाते. अवधूत यांचा मतदारसंघामध्ये मोठा दबदबा आहे. अवधूत यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीबरोबरच तटकरे कुटुंबीयांसाठीही हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –