परिवर्तन सभेत मुश्रीफांच्या समर्थकांचा गोधंळ ; महाडिकांचं भाषण थांबवलं

कोल्हापूर : पोलीसनामा – राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा कोल्हापुरमधील कागल येथे पोहचली आहे. या सभेत राष्ट्रवादीत असलेली धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित आहेत. यांच्यासमोरच हा प्रकार घडला आहे.

कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक हे भाषणाला उभे राहिले. तेव्हा त्यांच्या भाषणाला विरोध करण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याच कार्यकर्त्यांनी महाडिक यांच्या भाषणाला विरोध केला. भाषणाला विरोध झाल्यामुळे महाडिक भाषण सोडून बाजूला बसले. त्यावर मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दम दिला. आपण मुन्ना महाडिक यांनाच शंभर टक्के मतं देऊन निवडून आणायचं आहे, असं मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना बजावलं.

तसंच मुश्रीफ यांनी त्यानंतर धनंजय उर्फ मुन्ना महाडिकांना भाषण देण्याची विनंती केली. मात्र महाडिक पुन्हा भाषण करण्यास तयार नव्हते. त्याचवेळी बाजूला उभ्या असलेल्या नेत्याने महाडिकांच्या हाताला धरुन ओढून भाषणासाठी आणलं.

दरम्यान, पूर्वीच्या निवडणुकांमध्ये धनंजय महाडिक यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला होता. त्यासोबतच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी मुश्रीफ यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांमध्ये महाडिकांविरोधात रोष आहे. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुश्रीफांची समजूत काढली. त्यामुळे धनंजय महाडिक यांचीच उमेदवारी शरद पवार यांनी निश्चित केली.