‘शंभर कुत्रे एका वाघाची शिकार करु शकत नाहीत’ : जितेंद्र आव्हाड

आव्हाडांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांचा प्रचार रंगदार होत चालला आहे तशीच प्रचाराची पातळी देखील खालावत चालली आहे. जंगलातील शंभर कुत्रे एका वाघाची शिकार करु शकत नाहीत, ते फक्त भुंकू शकतात अशी खालच्या पातळीवरची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगोला येथे शरद पवार यांच्या टीका करताना म्हटले होते, चार खासदारांच्या जीवावर शरद पवार दिल्लीत सौदेबाजी करतात. त्याला उत्तर देताना आव्हाड यांनी अशा प्रकारचे शब्द वापरले आहेत.

आव्हाड यांनी आज ट्विटरवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यात एक व्हिडीओ देखील आहे. यामध्ये त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे. कधी एकही निवडणूक न जिंकलेले नाहीत. लॉटरी लागली म्हणून तुम्ही जिंकून आलात. गेल्या २-३ दिवसात तुम्ही ज्या पद्धतीने शरद पवार यांच्यावर टीका करत आहात. पण तुमच्या लक्षात आले आहे की शरद पवार यांच्यावर टीका केली की हेडलाईन मिळते. तळागाळात माहित नसलेल्या चंद्रकांत दादांना लोक ओळखू लागतात. कारण काय तर ते शरद पवार यांच्याव टीका करतात. अशा प्रकारची टीका गोपीनाथ मुंडे यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी १९९०-९५ या काळात केली होती, असे आव्हाडांनी व्हिडीओत म्हटले आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1112243322234552320

त्याच बरोबर आव्हाड हे देखील म्हणाले की, ‘जंगलातील शंभर कुत्रे एका वाघाची शिकार करु शकत नाहीत, ते फक्त भुंकू शकता. गेल्या ४० वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार हे केंद्रबिंदू आहेत. अनेक जण आले त्यांच्यावर टीका केली आणि वृत्तपत्रात हेडलाईन घेतली. पण त्यातील काही काळाने संपवले काही स्वत:हून संपले’.