मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीला आणखी एक ‘धक्का’ ! ‘या’ आमदाराचा भाजप प्रवेश निश्चित ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने राष्ट्रवादीला धक्के दिले आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील वातावरण तापायला लागले आहे. अशातच आऊट गोईंगने हैराण झालेल्या राष्ट्रवादीला मतदानाच्या आधीच आणखी एक धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

आमदार रामराव वडकुते हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला त्यांच्या मुलाने देखील दुजोरा दिला आहे. रामराव वडकुते हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, त्यांना पक्षाने संधी दिली नाही. पक्षाने संधी न दिल्याने ते नाराज झाले होते. अखेर त्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होत आहे तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्राची सत्ता कोण काबीज करणार, याबाबत चर्चा आणि पैजा लावल्या जात आहेत. आघाडीवर मात करुन पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु आहेत. तर गेलेली सत्ता पुन्हा काबीज करून पुन्हा कमबॅक करण्यासाठी आघाडीचा प्रयत्न आहे. महायुती पुन्हा सत्ता स्थापन करणार की आघाडी कमबॅक करणार हे 24 ऑक्टोबरला समजेल.

Visit : Policenama.com