सुशांत प्रकरणात रोहित पवारांनी भाजपवर साधला निशाणा

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे. त्यातच बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजपा अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा समोर आणताना दिसत आहे. याच मुद्यावरून आमदार रोहित पवार यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे.

भाजपकडून छापण्यात आलेल्या सुशांत सिंह राजपूतच्या स्टिकरचे छायाचित्र रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व देश एकवटला आहे. असे असताना त्याचे वाईट राजकारण केले जात आहे. आधी बोलल्याप्रमाणे बिहार निवडणुकीसाठी भांडवल केले जात असल्याचे दिसत आहे .विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याच्या या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत, ही अपेक्षा, अशी टीका रोहित यांनी केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूनंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास सुरूवातील मुंबई पोलिसांकडे होता. त्यानंतर सीबीआयकडे देण्यात आला. बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपानंतर बिहार सरकारने या प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.