Coronavirus : भाजपाला फक्त राजकारणाशी देणं-घेणं, आमदार रोहित पवार ‘भडकले’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – महाराष्ट्र कोरोनाशी लढत असताना सगळी जनता चिंताग्रस्त आहे. अशी अवघड परिस्थिती असताना भाजपचे नेते राजकारण करत आहेत अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भाजपला कोरोनाशी नाही फक्त राजकारणाशी देणे-घेणे असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करावी अशी शिफारस कॅबिनेटने राज्यपालांना केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यावर कायदेतज्ज्ञांचे मत घेत आहेत. राज्यापालांच्या निर्णयाला विलंब लागत असल्याने सत्ताधारी पक्षांनी राज्यपालांवर टीका केली आहे. कोरोनामुळे विधान परिषदेची निवडणूक शक्य नसल्याने मंत्रिमंडळाने ही शिफारस केली होती. ठाकरे हे सध्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत एका सहभागृहाचे सदस्यत्व मिळवणे आवश्यक आहे.

दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली. या सगळ्या घडामोडींवरून पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. मंत्रिमंडळाच्या या शिफारसीला काही लोकांनी कोर्टात आव्हानही दिले होते. मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळत यावर राज्यपालांनीच निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले होते. या याचिकाही भाजपच्याच नेत्यांच्या इशार्‍याने टाकण्यात आल्याची टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.