रोहित पवारांचे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहिल्यादेवींचा जन्म राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात झाला आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात केले होते. यावर भाजपचे नेते राम शिंदे यांनी निशाणा साधला होता. नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून झाला असल्याची टीका राम शिंदे यांनी केली. राम शिंदे यांच्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जेजुरी येथील भाषणावर टीका करणाऱ्यांनी ते नीट ऐकलेले दिसत नाही. या भाषणातून आणि यापूर्वीही पवारांनी अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मानच केला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यापूर्वी त्यांनी मला अहिल्यादेवींबद्दल सांगून जबाबदारीने काम करण्याचा सल्ला दिला होता. आम्ही अहिल्यादेवींचा सन्मानच करत आलो आहोत, असे प्रत्युत्तर त्यांनी राम शिंदे यांना दिले आहे.

नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. रोहित पवार म्हणाले, शरद पवार यांनी होळकर यांचे जन्मस्थान आणि माझा मतदारसंघ यासंबंधी जो उल्लेख केला आहे तो नीट ऐकायला पाहिजे. त्यांनी आपल्या भाषणातून अहिल्यादेवींचा सन्मानच केला आहे. या मतदारसंघातील चोंडी गावा अहिल्यादेवींचा जन्म झाला आहे. तेथे काम करण्याची तुला संधी मिळणार आहे. त्यांनी जसे पाणी आणि अन्य क्षेत्रांत काम करुन जनतेची सेवा केली, त्यातून आदर्श घेऊन काम कर, असा सल्ला मला पवार यांनी तेव्हाच दिला असल्याचे रोहित पवार यांनी केले. तसेच मी आजही त्याच जबाबदारीने काम करत आहे. त्यामुळे या संबधी होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्षच केलेले बरे, असेही ते म्हणले.