पार्थ पवारांनी पुन्हा सरकारला ‘डिवचलं’, रोहित पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून आता सीबीआयकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टानेही आज महत्त्वाचा निकाल देत मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे देण्यास सांगितले आहे. सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील ठाकरे सरकारला धक्का बसला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली आहे. पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत कोर्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे.
पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी विसंगत भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतला न्याय मिळायलाच पाहिजे. पण आम्ही मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीमागए ठामपणे उभे आहोत. पार्थने काय ट्विट केलं माहित नाही. पण ट्विटचा प्रत्येकाला हवा तसा अर्थ काढता येतो, ते प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून असतं, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते ‘ असं सूचक ट्विट केलं. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनीकरित्या फटकारल्यानंतरही पार्थ पवार याप्रकरणी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. दरम्यान, शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या भूमिकेवर आक्रमक होत जाहीरपणे खडेबोल सुनावले होते. शरद पवारांच्या या आक्रमक भूमिकेनंतरही पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने राष्ट्रवादीतील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.