रोहित पवारांची भाजपा प्रदेशाध्यक्षांवर बोचरी टीका, म्हणाले – ‘चंद्रकांतदादांनी शिवसेनेतच प्रवेश केला नाही म्हणजे झालं’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचे विधान केल्यानंतर शिवसेनेने टीका केली असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. भाजपला सत्तेत जाण्याची घाई लागली आहे. ही घाई बघता चंद्रकांतदादांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विटकरून ही खोचक टीका केली आहे. आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता पाच वर्षात भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत ते मलाच महाविकास आघाडीत घ्या असं म्हणतील. काय सांगावं ते शिवसेनेतही प्रवेश करतील, असा टोला रोहित पवार यांनी पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे. यावेळी त्यांनी राजकारण थांबवण्याचं आवाहनही केलं.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाचे संकट पाहता आम्ही आजही राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्यात आहोत. मात्र शिवसेनेत एकत्र आलो तरी त्यांच्यासोबत निवडणुका लढवणार नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला होता. तसेच भाजपचं केंद्रीय नेतृत्व एकत्र येण्याचा फार्म्यूला ठरवेल. हा फॉर्म्युला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर झाल्यास आम्ही शिवसेनेसोबत जाऊ, असे पाटील म्हणाले होते.