एकनाथ खडसेंनी भाजपचा राजीनामा देताच रोहित पवारांनी सांगितला निसर्गाचा ‘तो’ नियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  मागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असणाऱ्या एकनाथ खडसेंनी ( Eknath Khadse) अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता खडसे हे शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP) प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खास ट्विट केलं आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत निसर्गाचाच नियम आहे,ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते” असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते. WelCome एकनाथ खडसे साहेब!” असं म्हणत रोहित पवार यांनी खडसेंचं पक्षात स्वागत केलं आहे. जळगावमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.

दरम्यान, खडसे हे राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर या प्रवेशाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, गेली तीन साडे तीन दशके भाजपामध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याचे मला कळवले आहे. ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच खडसे यांना मानणारे, त्यांचे पाठिराखे असलेले नेते आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. तसेच खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल, तसेच एकनाथ खडसेंना कृषिमंत्री पद देण्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे.