आ. रोहित पवारांनी आरे कॉलनीतील स्थानिकांशी साधला ‘संवाद’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील आरे कॉलनीत येऊन पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांसोबत संवाद साधला. यावेळी रोहित पवारांनी रिक्षा देखील चालवली, क्रिकेटचाही आनंद घेतला. याशिवाय त्यांनी बाईकवरून आरेत फेरफटकाही मारला. यावेळी काही स्थानिक रहिवाशांनी रोहित पवारांकडे विविध मागण्याही केल्या.

पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनामुळं आरेतील मेट्रो कारशेडचा मुद्दा प्रचंड वादात अडकला होता. यानंतर ठाकरे सरकारनं मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला. परंतु जंगलतोड होऊ नये यासाठी पर्यावरणप्रेमी आंदोलनकर्त्यांवर अनेक गुन्हे नोंदवण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि स्थानिक आदिवासींच्या घराचा प्रश्न एसआरएच्य माध्यमातून सोडवण्यात यावा अशी मागणी रोहित पवारांकडे करण्यात आली.

यावेळी रोहित पवारांनी या लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. राज्य सरकारनं आरेतील जंगल वाचवलं आहे. त्या ठिकाणी आणखी झाडं आपण लावू. केंद्र सरकरानं मेट्रो कारशेडचं राजकारण करू नये, राज्य सरकारला सहकार्य करावं. कोणताही अहंकाराचा मुद्दा यात आणू नये असं सांगत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

रोहित पवार यांनी न्युझिलंड हॉस्टेललाही भेट दिली. तेथील अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. याशिवाय त्यांनी व्हॉलीबॉल आणि क्रिकेटचा आनंदही घेतला. त्यांनी काही नारळ विक्रेत्यांसोबत गप्पाही मारल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्तेही उपस्थित होते.