सुप्रिया सुळेंपाठोपाठ प्रफुल्ल पटेलांनी घेतली राज्यपालांची भेट; भाजप आमदारानं केलं रिट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा सुरु आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी राज्यपालांची काही दिवसांच्या अंतराने भेट घेतली. या भेटींची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत असून, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रफुल्ल पटेल आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीचे ट्विट रिट्विट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नितेश राणे यांनी रिट्विट केल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.

राज्यातील कोरोना परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत असली, तरी रुग्णांच्या मृत्यची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. या दोन मुद्यांवरुन राज्यात सध्या चर्चा सुरु आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन बड्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी 2 मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपालांची भेट घेतली. पटेल आणि राज्यपाल यांच्यात एक तास चर्चा झाली. मात्र चर्चा आहे ती पटेल यांनी सुप्रिया सुळे यांच्यानंतर काही दिवसांत राज्यपालांची भेट घेतली. महत्त्वाचे म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पटेल-राज्यपाल यांच्या भेटीचे ट्विट रिट्विट केलं आहे. यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होत आहे ? अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे.

दहा दिवसांत राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. या दोन नेत्यांच्या भेटी मागील कारण कळू शकलेलं नाही. राज्यपालांच्या या भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी अद्याप कोणतेही ट्विट केले नाही. मात्र, राज्यपाल कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन भेटीची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे नितेश राणे यांनी भेटीचं रिट्विट केलं आहे.