खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेस्टॉरंटस व्यावसायिकांच्या बाबत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. यापूर्वी जिम आणि सिंगल स्क्रीन थिएटर सुरु करण्याबद्दल सुळे यांनी पाठपुरावा केला होता.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन म्हटलं की, “कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सल्स सेवेची मुभा देण्यात आली असली तरी यातून या उद्योगाला सावरण्यासाठी ही गोष्ट पुरेशी नाही. याशिवाय अनेक रेस्टॉरंट चालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.”

तसेच “मुख्यमंत्र्यांनी या व्यावसायिकांना होणार त्रास लक्षात घेता, रेस्टॉरंटस सुरु करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारे सोशल डिस्टन्सिंग आदींचे आवश्यक दिशानिर्देश देखील जारी करावेत. आपणास विनंती आहे की, कृपया या व्यावसायिकांच्या बाबतीत सहानभूती पूर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबने सुप्रिया सुळे यांची भेट घेत एक निवेदन देऊन रेस्टॉरंट सुरु करण्याची मागणी केली होती.

मागील सहा महिन्यांपासून राज्यातील रेस्टॉरंट व्यवसाय बंद असून, चालक आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या सरकारने पार्सल सुविधा देण्याची परवानगी दिली असली तरी ती उदरनिर्वाहासाठी ही गोष्ट पुरेशी नसल्याचं संघटनेने म्हटलं आहे. अनेक रेस्टॉरंट चालकांचा मूळचा व्यवसाय हाच असल्याने रेस्टॉरंट चालक मानसिक तणावाखाली वावरत आहेत. तसेच कामगारांचा पगार, जागेच भाडं, लाइट बिल आदी गोष्टी कराव्या लागत असल्याने रेस्टॉरंट चालक आर्थिक संकटात सापडले आहेत.