‘त्या’ फोटोमुळे सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेची ‘झोड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील गणपतीचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांनी काढलेल्या सेल्फीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

ठाकरे व पवार कुटुंब एकत्र आल्याचे फोटो सुप्रिया सुळे यांनी त्या दिवशी शेअर केले होते. त्यात एक फोटो शरद पवार हे सपत्निक गणरायाचे दर्शन घेत असतानाचा होता. तर दुसरा फोटो दोन्ही कुटुंबाचा एकत्रित फोटो होता. तिसरा फोटो त्यांनी स्वतंत्रपणे ट्विट केला होता. या फोटोला त्यांनी MY CKP Moment – Patankar, Sardesai, Thackeray – Sule अशी कॅप्शन दिली होती. यावरुनच नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केलं आहे. त्यांच्या या ट्विटवर 204 जणांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.

यातील काही जणांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खरपूस टीका केली आहे. एक तरुण नेतृत्व म्हणून आपल्याकडून यापेक्षा चांगल्या अपेक्षा आहेत. आपण अमानवी जातीव्यवस्थेविरोधात लढा देण्यासाठी काम करण्याची गरज आहे. तिचं उदात्तीकरण करण्यासाठी नाही, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने सुप्रियांना शरद पवारांचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘अतिशय टाकाऊ ट्विट’, आपल्या जातीचा उल्लेख अभिमानाने करणे लोकप्रतिनिधींना शोभत नाही. जातीअंत काय फक्त सभेत भाषण देण्यापुरता बोलायचा का ? आपल्या वडिलांनी ‘मी मराठा आहे’ असा कधीच उल्लेख केला नाही. निदान त्यांचा दरी आदर्श घ्यावा असे वाटते. चूक लक्षात येईल ही अपेक्षा, असे एकाने म्हटले आहे. तर एकाने सिकेपीचा अर्थ विचारला आहे.