RSS शी संबंधित कार्यशाळेला खा.सुप्रिया सुळेंचा ‘आक्षेप’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नेमके काय चालू आहे? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख’ या विषयावर विद्यापीठातील वृत्तविद्या विभागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे आणि ही कार्यशाळा आता वादाचा मुद्दा झाली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विश्व संवाद केंद्राने ही कार्यशाळा आयोजित केली असून येत्या १५ तारखेला संघाचे विभागीय कार्यालय असलेल्या पुण्यातील मोतीबागेतील केशव सभागृहात सकाळी नऊ ते दुपारी एक यावेळात कार्यशाळा होणार आहे आणि संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख अनिरुद्ध देशपांडे हे मुख्य व्याख्याते आहेत. विद्यापीठाने अधिकृत पत्रक काढून या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे अशी नोटीस काढली आहे.

खा. सुप्रिया सुळे यांनी या प्रकाराला आक्षेप घेतला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठात नेमके काय सुरु आहे? विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला पाठविण्याची आयडिया कोणाची? संज्ञापन आणि वृत्तपत्र विभागात खास नोटीस काढून वेळापत्रकात संघाशी संबंधित कार्यक्रम जाणीवपूर्वक लावला. विद्यापीठाच्या कुलगुरुंचीही याला संमती आहे का? अशी विचारणा खा.सुळे यांनी केली आहे.