मुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही ? ; आघाडीचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे थोर सुपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणा-या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपाला लाज कशी वाटत नाही? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जराही लाज असेल तर देशाची माफी मागावी. असे त्यांनी म्हंटले.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने गांधीभवन येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या भाजपा उमेदवारीवरून भाजपावर टीका केली. त्यावेळी प्रज्ञा सिंह यांनी महाराष्ट्राचे महान वीरपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अवमान केला आहे. हा फक्त करकरेंचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि शहीदांचा अवमान आहे. शहीदांच्या शौर्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणा-या पंतप्रधान मोदी आणि भाजपाने तात्काळ माफी मागावी आणि प्रज्ञा ठाकूर यांची तत्काळ हकालपट्टी करावी. अशी मागणी त्यांनी केली.

याचबरोबर, करकरे परिवाराने आपला कुटुंबप्रमुख गमावला त्याचे दुःख पचवताना एकच प्रामाणिक अपेक्षा ठेवली की आपल्या कुटुंबाच्या बलिदानाचा देशातील जनता आदर राखेल परंतू या भावनेलाच भाजपाने बाधा पोहोचवली आहे. भाजपाने शहीद करकरेंना देशद्रोही ठरवले आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड वेदना होत असतील. नेहमी शहीद करकरे कुटुंबियांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मुख्यमंत्र्यांनी शहीद हेमंत करकरेंचा अपमान करणा-या प्रज्ञा ठाकूरचा साधा निषेधही केला नाही. महाराष्ट्राचा अवमान केल्याबद्दल मोदी शाह यांना आनंद होत असेल पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपाला हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहताना लाज कशी वाटत नाही? असा सवालही त्यांनी केला.

तसेच, साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर यांना उमेदवारी देवून भाजपाने दहशतवादाला समर्थन दिले आहे हे दिसून आले आहे. भाजपाचा साध्वीच्या रुपाने खरा चेहरा समोर आला आहे. दहशतवादाशी लढत असल्याचे ढोंग भाजपा करत असल्याचे दिसून येत आहे. असा दावाही त्यांनी केला.