कोणाला किती अहंकार आहे हे लोक पहात आहेत, नवाब मलिकांचा भाजपला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोणाला किती अहंकार आहे हे लोक पहात आहेत. आमचे लोक जमीनीवर असून भाजपचा अहंकार लोकांनी पाहिला आहे. अहंकार कसा असावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिसू शकत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

नवाब मलिक यांनी यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर देखील जोरदार टीका केली. प्रवीण दरेकर आरसा पाहून जॅकेट घालून येतात. आशासमोर पाहून टीव्ही समोर येतात. याला सरकारला घेरणं म्हणत नाहीत. ही खालच्या पातळीवर जाऊन प्रसिद्धीसाठी करण्यात आलेली धडपड असल्याची टीका मलिक यांनी यावेळी केली. तसेच काही विरोधी पक्षनेते तर कार्यालयात बसूनच प्रतिक्रिया देतात, असाही टोला त्यांनी लगावला.

विरारमध्ये हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेवर बोलताना नवाब मलिक म्हणाले, हे पालिकेचं किंवा शासकीय रुग्णालय नाही असे सांगताना चौकशीअंती सत्य बाहेर येईल असं त्यांनी म्हटलं आहे. खासगी रुग्णालयाच्या चुकीसाठी सरकारला दोष देणे योग्य नसल्याचे मलिक म्हणाले.