Lockdown in Maharashtra : ‘राज्यात Lockdown सरसकट उठवणे अडचणीचे ठरेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या रुग्णसंख्या घटत असल्याने लॉकडाउन शिथील करण्याची मागणी होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ठाकरे सरकार लॉकडाउन उठवणार की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे. राज्यात 31 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही जिल्ह्यात 3 ते 5 टक्के प्रमाण आहे. सरसकट लॉकडाउन उठवता येत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेतला जाईल, पण लॉकडाउन सरसकट उठवणे अडचणीचे ठरेल. निर्बंध शिथील करण्यासंबंधी मुख्यमंत्री 31 मेच्या पूर्वी निर्णय घेतील, असे मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्यात कोरोना स्थितीसंबंधी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते की, सध्याचा कोरोना विषाणू फार घातक असून वेगाने पसरत आहे. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेंव्हा मागील अनुभवातून शहाणे व्हावे लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील, असेही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाउन वाढणार का असे विचारले असता ते म्हणाले की, सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणी ही गाफील राहू नये, असे ते म्हणाले.

तसेच ठाकरे सरकार 4 टप्प्यात लॉकडाउन शिथील करण्याची योजना आखत असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
पहिला टप्पा – दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहिल.
दुसरा टप्पा – दैनंदिन गरजांशी संबंधित अन्य काही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पर्यायी दिवसांवर ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल.
तिसरा टप्पा – हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, दारुच्या दुकानांना निर्बंधासह सुरु ठेवण्यास परवानगी असेल. हॉटेल्सना 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाईल.
चौथा टप्पा – मुंबई लोकल, धार्मिक स्थळे, जिल्हाबंदी पुढे ढकलली जाऊ शकते.