राष्ट्रवादी काॅंग्रेस : ‘त्या’ 3 महत्वाच्या मतदार संघांत सस्पेंस कायम 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. काँग्रेसने काल महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. मात्र त्या यादीत अद्यापही काही महत्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची यादी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
राष्ट्रवादीने आपल्या पहिल्या यादीत वाद असलेल्या जागांवर उमेदवार घोषित करणे टाळले आहे. यामध्ये माढा ,अहमदनगर, बीड, मावळ, गोंदिया या जागांवर उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत. माढामधून शरद पवार नाहीत, तर कोण लढणार ? मावळमधून पार्थ पवार लढणार की नाही ? या सगळ्या गोष्टींबाबत राष्ट्रवादीने अद्याप सस्पेंस कायम ठेवला आहे. रावेर, सिंधुदुर्गसह चार ते पाच जागांवर अद्यापही कॉंग्रेससोबत चर्चा सुरु आहे. तसेच नगरची जागा काँग्रेसला सोडण्यात येणार नाही, असेही जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा – #Loksabha : राष्ट्रवादीकडून 11 जणांना अधिकृत उमेदवारी जाहीर 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने 11 उमेदवार जाहिर केले आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील 10 आणि लक्षद्वीपमधील 1 अशा 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे. हातकणंगले लोकसभेची जागा स्वाभीमानी संघटनेसाठी सोडली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

रायगड सुनील तटकरे, बारामती सुप्रिया सुळे, सातारा उदयनराजे भोसले, कोल्हापूर धनंजय महाडीक बुलढाणा राजेंद्र शिगरे, परभणी राजेश विटेकर, जळगाव गुलाबराव देवकर, मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील, ठाणे आनंद परांजपे, कल्याण बाबाजी पाटील, लक्षद्वीप महंमद फैजल, उर्वरीत काही नावे उद्या आणि परवा जाहिर करण्यात येतील.

महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.