विधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे व एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाचेही सत्र सुरु झाले आहे. विधानसभेचे उपसभापती आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी हे विकासकामांच्या नावाखाली ठेकेदाराकडून बळजबरीने कमिशन घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांनी केला आहे. तसेच विजय औटी हे कमिशन मागत असल्याची व्हिडिओ क्लिप वेळ आल्यावर जनतेसमोर ठेवणार असेही ते म्हणाले आहेत. भाळवणी येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

औटी यांच्यावर आरोप करताना निलेश लंके म्हटले की , ‘विजय औटी हे विकास कामाच्या नावाखाली ठेकेदाराकडून बळजबरीने कमिशन घेत असून वेळप्रसंगी त्याची व्हिडिओ क्लिप देखील जनतेसमोर ठेवणार.’

निलेश लंके हे औटी यांचे खंदे समर्थक मानले जायचे. मात्र आता औटी यांनीच कट कारस्थान करून शिवसेनेतून लंकेंची हकालपट्टी केली होती असा आरोप लंके स्वतः करत आहेत. शिवसेना सोडल्यानंतर लंके यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर मतदारसंघातील उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत.

शिवसेनेचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पारनेर विधानसभा मतदारसंघातून विजय औटी यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे. या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस निलेश लंके यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे.