अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचे पक्षातील नेते आणि सरकारवर ‘गंभीर’ आरोप

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी – चिंचवड हा बालेकिल्ला मानला जातो. येथील सर्व लोकप्रतिनिधींशी ते सतत संपर्कात असतात. परंतु, येथील एका नगरसेवकाने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यातील आघाडी सरकारवर गंभीर आरोप करून सरकारला आणि पक्षाला घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रवादीच्या या नगरसेवकाचे नाव दत्ता साने असून त्यांनी म्हटले आहे की, माझ्या जीविताला काही जणांकडून धोका आहे. याबाबत वारंवार सांगूनही पक्षातील जेष्ठ नेते, गृहमंत्री किंवा स्थानिक पोलीस कुणीही तक्रारीकडे लक्ष देत नाहीत.

नगरसेवक दत्ता साने यांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकाला घरचा आहेर मिळाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या जिविताला धोका असूनही आणि त्याने वारंवार मागणी करूनही कुणीच लक्ष देत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. साने यांनी जीविताला धोका असल्याचे म्हटले असून याबाबत कुणीही लक्ष देत नसल्याने त्याविरोधात आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.

अज्ञात हल्लेखोरांनी 7 जून 2019 रोजी साने यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला होता. हल्ला करणार्‍या सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केले होते. आता ते आरोपी जामिनावर सुटले आहेत. या आरोपींकडून व हल्ल्याच्या सुत्रधाराकडून माझ्या जीविताला धोका आहे, असे साने यांनी म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे भोसरी विधानसभेचे स्थानिक आमदारच यामागे असल्याचा आरोप साने यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेकाने न्याय मिळत नसल्याने आमरण उपोषण करण्याचे जाहीर केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जिवितास धोका असल्याचे पक्षातील नेते, गृहमंत्री आणि स्थानिक पोलिसांना सांगूनही लक्ष दिले नाही, असा गंभीर आरोप नगरसेवक साने यांनी केला आहे. साने यांच्या आरोपानंतर यापाठीमागे नक्की कोणते राजकारण आहे, यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे.

You might also like