आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार ; राष्ट्रवादीची पोस्टरबाजी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल दि. २० ला रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरून ‘बुरा ना मानो होली है’ म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मुंबईत भाजपविरोधात पोस्टरबाजी केलीय. या पोस्टरमधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना टार्गेट करण्यात आलंय. या पोस्टरमधून मोहिते पाटील आणि भाजपाची उडवली खिल्ली उडवण्यात आली आहे.

‘ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले, त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले. आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार’ असा आशय या पोस्टरमध्ये लिहीण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुंबईतील घरासमोरही लावण्यात आले आहेत.

आधी डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजप प्रवेश केला. त्यानंतर मुले पळवण्याच्या टीकेवरून टीकांचे सत्र सुरु झाले. विरोधकांनी भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाळणाघर म्हणूनही संबोधले. तर भाजपने मुलंच काय पण तुमची नातवंड ही पळवू, असं म्हणत उत्तर दिलं. त्यानंतर आता रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ‘पक्षातल्या घुसमटीमुळे नाही तर मोदींच्या करिष्म्यामुळे प्रभावित होऊन भाजपात प्रवेश करत असल्याचं’ त्यांनी यावेळी म्हटलं होतं.

दरम्यान, रणजितसिंह यांच्या प्रवेशानंतर मात्र राष्ट्रवादी युवकने पोस्टरबाजी करत रणजितसिंह आणि भाजपची खिल्ली उडवली आहे.