कोरोनाच्या रुग्णांसाठी शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. हा आकडा ६०० च्या वर गेला आहे. राज्य सरकार कोरोनाशी लढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन कोरोना बधितांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे एक पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. देशात कोरोनाची संख्या वाढत असताना त्यांनी घेतलेला निर्णय खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

काय आहे पत्रात
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करत आहे. जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी देशात संचारबंदी सारखं पाऊल उचलावे लागले आहे. त्यामुळे लोकांचा रोजगार बुडाला आहे. शेती व उद्योगधंद्यांवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे. या अभूतपूर्व संकटावेळी राष्ट्रवादी पक्ष जनतेसोबत आहे, असं शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

राष्ट्रवादी पक्षाची एक सामाजिक जबाबदार म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या उद्देशाने राज्य विधिमंडळातील विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तर संसदेतील लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीत देण्यात येणार आहे. सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्याचे सर्व आमदार आणि खासदारांना कळवण्यात आले आहे.

राज्यपालही देणार एका दिवसाचे वेतन
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचे आज जाहीर केले. आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजभवनातील सर्व अधिकारी व कर्मचारी देखील आपले एक दिवसाचे वेतन करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे राजभवनाकडून आज जाहीर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 21 दिवसांच्या संचारबंदीच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १४ एप्रिल पर्यंत आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. या कालावधीत जनतेच्या भेटी देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र राज्यपाल आपल्या कर्तव्य पालनाकरीता आवश्यक अभ्यागत तसेच अधिकाऱ्यांना या कालावधीत भेटतील, असे आज राजभवनातून आज जाहीर करण्यात आले.