माझ्या ‘निवृत्ती’चा अनेकांनी ‘प्लॅन’ केला होता पण…, शरद पवारांनी फडणवीसांना लगावला ‘टोला’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या हातात पुष्पगुच्छ देत बहुदा आपण राजकारणातून निवृत्त व्हा, असे तर हे दोघे मला सांगत आहेत का असेच वाटले. भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवारांनी आपल्या सत्कारासंदर्भात सत्काराचा मिश्कीलपणे उल्लेख करत अशी टिप्पणी केली. तसेच अनेकांना विधानसभा निवडणुकीच्यावेळी मी राजकारणातून निवृत्त होईन असे वाटत होते. पण तसे काही घडले नाही. महाराष्ट्रातील जनतेने तसे काही घडु दिले नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

बारामतीतल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बारामतीत आले आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभानंतर केलेल्या भाषणात पवारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या स्टाईलचं राजकारण आता संपलं अशी टीका केली होती.

यावेळी शरद पवार पुढे म्हणाले, आज जागतिक स्थिती बदलली आहे. त्यातून सतत नवे कृषी संशोधन आपल्याला पहायला मिळत आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात, माणसांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी शेतीत नवनवीन संशोधन करण्याची गरज आहे. देशात न्यायालयाने कृषी संशोधन करण्यावर बंदी घातली आहे. न्यायाधीशांचे हे काम आहे का ? यावर मला भाष्य करता येणार नाही. मात्र, त्यांनी अशा गोष्टीत लक्ष न घातलेलं बरं. जे अपायकारक आहे ते थांबवण्यास माझी मनाई नाही, पण जे उपायकारक असेल ते करण्यास काही हरकत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/