गोपीनाथ मुंडेंचे विचार व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कसब धनंजय मुंडेंकडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – गोपीनाथ मुंडेंनी अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन अनेक वर्षे राजकारण केले. तेच काम आता मोठ्या नेटाने पुढे घेऊ जाणाच्ये काम विरोधी पक्षात कोण करत आहे, असे बीडच्या जनतेला विचारल्यास ते धनंजय मुंडे यांचे नाव सांगतील. गोपीनाथ मुंडेंच्यानंतर धनंजय मुंडे हे समर्थपणे काम करत आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते बीड जिल्ह्यातील आष्टी येथे बोलत होते.

लोकसभेच्या प्रचारात पंकजा मुंडे या आम्हीच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा व विचार पुढे घेऊन जात असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र, गोपीनाथ मुंडे यांचे विचार व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कसब धनंजय मुंडे यांच्यात आहे. बीड जिल्ह्यातील जनता प्रगल्भ आहे. आपल्यासाठी तळमळीने कोण काम करते हे त्यांना माहित आहे, असेही शरद पवार म्हणाले.

गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जाग्या करताना शरद पवार म्हणाले, मी सत्ताधारी पक्षाचा मंत्री होतो. तेव्हा गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षात होते. अनेक वेळा आमची शाब्दिक चकमकही झाली. मात्र, व्यक्तिगत संबंध कधीच बिघडले नाहीत. त्यांच्या निधनानंतर आम्ही बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार द्यायचा नाही, असे ठरवले होते. ही गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलची आमची श्रद्धा होती.