मी पाकिस्तान समर्थक तर पद्म विभूषण का दिला ? शरद पवारांचा मोदींवर ‘पलटवार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मला पाकिस्तानधार्जिणा म्हणता, मग पद्मविभूषण का दिलात ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांवर पाकिस्तानचे कौतुक करत असल्याचा आरोप केला होता. त्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. एका न्युज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर पलटवार करताना शरद पवार म्हणाले की, ‘मी पाकिस्तानचा समर्थक आहे ,असे असेल तर मला पद्म विभूषण हा सन्मान कशाला दिला. या सन्मानाचा अर्थ असाच आहे की मी देशहितासाठी काही तरी काम केले आहे. पद्मविभूषण पुरस्कार खूप मोठा आहे. तो देशातला दुसऱ्या क्रमाकांचा नागरी पुरस्कार आहे. भाजपा सरकार जर इतका मोठा पुरस्कार मला देत असेल, तर मी देशाची काहीतरी महत्त्वपूर्ण सेवा केली असा त्याचा अर्थ होतो. एका बाजूला पुरस्कार द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला असे आरोप करायचे, हा दुटप्पीपणा कशासाठी? अशा पद्धतीचा दुटप्पी व्यवहार देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला शोभत नाही. ‘

मोदींना पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा राखता आली नाही –

पंतप्रधान मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, ‘पंतप्रधानपद ही एक वैधानिक पद आहे. त्यांच्याकडे खात्रीलायक माहिती मिळवण्याचे अनेक पर्याय असतात. त्यांनी योग्य माहिती घेऊन वक्तव्य केलं असतं, तर ते मला आवडलं असतं. पण पंतप्रधानच कोणतीही माहिती न घेता विधानं करत असतील, तर त्यावर काय बोलावं? मोदींना पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा राखता आली नाही.’

काय म्हणाले होते मोदी

शरद पवार यांना पाकिस्तानचा पाहुणाचार भावला. त्यामुळेच त्यांना पाकिस्तानचं कौतुक वाटतं, अशा शब्दांमध्ये मोदींनी पवारांवर टीका केली होती. जम्मू-काश्मीर संदर्भात पाकिस्तानबाबत काँग्रेसचा गोंधळ मी समजू शकतो. पण शरद पवार यांना देखील पाकिस्तान चांगला वाटतो. त्यांना तिथले शासक चांगले वाटतात. दहशतवाद्यांची निर्मिती करणारा देश पवारांना चांगला वाटतो हे दुर्दैवी आहे. असेही मोदी म्हणाले होते.

Visit : Policenama.com