शरद पवार उद्या पंढरपूर दौर्‍यावर

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  जिल्ह्यातील वरिष्ठ नेते एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष
सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांचे कोरोनाची लागण झाल्याने निधन झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या (२९सप्टेंबर) पंढरपूर दौऱ्यावर येणार असून, ते या तिन्ही सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर अनेक वर्षे शरद पवार यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. पवार यांचे जिल्ह्यातील विश्वासू सहकारी म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढलेले. मात्र, अनेक वर्षे मिळून काम केले असल्याने नेत्यांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध कायम राहिले.

परिचारक यांच्या निधनाआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे आणि त्यानंतर अलीकडेच रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांचे सुद्धा निधन झाले. (कै) यशवंतभाऊ पाटील यांच्यापासून शरद पवार यांचे पाटील यांचे घराण्याशी संबंध होते. राजबापू पाटील हे देखील पवार यांचे कट्टर कार्यकर्ते होते. रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांचाही शरद पवार यांच्याशी चांगला स्नेह होता. पंढरपुरातील परिचारक, पाटील आणि जाधव (कैकाडी) यांच्यासारखे निकटवर्तीय सहकारी गमावल्याने त्यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार हे मंगळवारी खास पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत.