Pune News : …अन् शरद पवारांनी शेअर केले त्यांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीतले अनुभव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या पुढाकाराने ४५ मीटर उंच राष्ट्रध्वज, “आय लव्ह वारजे” सेल्फी पॉईंट व येथील फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पवार यांचे हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा साोहळा पार पडला. त्यावेळी शरद पवार यांनी आपल्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतले अनुभव शेअर केले.

कार्यक्रमात सगळ्यांचे लक्ष शरद पवार यांच्या भाषणाकडे होते. पवार काय बोलतील, याची उत्सुकता होती. लोंकाच्यासाठी जो जगतो, त्याला लोक कधीच विसरत नाही. याचा मला ५० वर्षाचा अनुभव आहे, असे सांगत शरद पवार म्हणाले, “महापालिकेचा सदस्य जागृत असेल तर, आपला परिसर कसा बदलतो. याचे उत्तम उदाहरण वारजे परिसर आहे. मी पूर्वी याच खडकवासला मतदारसंघात प्रचारासाठी दोन तासांसाठी येत होतो. मात्र, याच खडकवासल्यातील मतदारांनी मला मतांचा विक्रम दिला आहे. पूर्वी या भागात नागरिक शेतीवाडी करायचे आता मात्र मी कुठे आलो आहे हेच कळतं नाही. एवढा बदल वारजे परिसरात झालेला आहे. विविध भागातून नागरिक येथे राहावयास आल्याने शेतीऐवजी येथे सोसायट्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वारजे बदलत आहे. यात शंकाच नाही.” दरम्यान, “वारजेच्या जवळ एनडीए आहे. त्यामुळे आपल्या देशाचा अभिमान म्हणून येथे हा देशाचा भव्य ध्वज उभारण्यात आला आहे”, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक सचिन दोडके, लक्ष्मी दुधाने, दिलीप बराटे, सायली वांजळे, रुपाली चाकणकर, स्वाती पोकळे, दीपक मानकर, बाबुराव चांदेरे, काका चव्हाण, अनिता इंगळे, योगेश दोडके, शुक्राचार्य वांजळे, बाबा धुमाळ व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.