राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन ! आमदार गिरीश महाजनांना दाखवा, 10 लाख मिळवा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोनाने उद्रेक केला असून, याचबरोबर जळगाव येथील जामनेर शहरातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनावर अधिक ताण निर्माण झाला आहे. तर संकटमोचक आणि आरोग्यदूत म्हणवून घेणारे जामनेरचे अमादार गिरीश महाजन जामनेरवासियांना वाऱ्यावर सोडून पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. असा जोरदार आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तर, आमदार गिरीश महाजन दाखवा आणि १० लाख रुपये मिळवा’ असे फलक दाखवत आंदोलन देखील केलं आहे.

भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर तालुक्यात करोनाचा उद्रेक झाला आहे. तर जळगाव जिल्ह्यात दैनंदिन १ हजार ते १२०० असे रुग्ण सापडत आहेत. तर जामनेरात करोना संसर्ग वेगात वाढत असताना जामनेरचे आमदार मात्र पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याचे म्हणत राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झालीय. यावरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शहरात आज अनोखे आंदोलन केले. ‘तालुक्याचे आरोग्यदूत आमदार गिरीश महाजन साहेब आहेत तरी कुठे? आपणास संपू्र्ण तालुका आणि जामनेर शहरातील रहिवासी शोधताहेत, आता तरी करोनाच्या महामारीत मदतीला धावून या..’ असं लिहिलेले फलक दाखवत राष्ट्रवादीने महाजन यांना लक्ष्य केले आहे.

तसेच, आमदार गिरीश महाजन यांना दाखवा आणि १० लाख रुपये मिळवा ’अशा घोषणा देखील राष्ट्रवादीचे पदाधिकारी देत होते. कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीच्या काळात सर्व आमदार आपापल्या कार्यक्षेत्रात झटून कार्य करीत आहेत. अशा परिस्थितीत महाजन यांची तालुक्याला आवश्यकता असताना ते येथे दिसत नसल्याबद्दल देखील आंदोलनकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या दरम्यान, आता भाऊ खूप झाले. कोरोनामुळे जनता भयभीत झाली आहे. जनतेला तुमची गरज आहे. आमदार म्हणून जनतेला धीर देण्याचे काम तुमचे आहे पण, तुम्ही पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीत व्यस्त आहात. तुम्हाला जनतेपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे असे दिसते. आता तरी तुम्ही जामनेर तालुक्यात परत या आणि जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध व्हा, असे आवाहन राष्ट्रवादीकडून यावेळी गिरीश महाजन यांना आंदोलनातुन करण्यात आले आहे.