डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – नगरच्या लोकसभा जागेवरून सध्या राजकारणात मोठे नाट्य रंगल्याचे दिसते आहे. त्याचा आज नवीन अध्याय पुण्यात घडला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या काही महत्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी चर्चा झाल्याची बातमी माध्यमात झळकली होती. याबाबत शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. मी विखे पाटलांना अद्याप भेटलोच नाही. तर सुजय विखे पाटील राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार हे मला माध्यमातूनच समजले आहे असे शरद पवार म्हणाले आहेत.

सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादीतून निवडणूक लढणार हे मीच वृत्तपत्रातून वाचतो आहे. त्यामुळे प्रसार माध्यमे माझ्या ज्ञानात भर टाकत आहेत असे म्हणत शरद पवार यांनी पुन्हा सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारी वरून विखे पाटलांना डिवचले आहे.

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मोदी बाग या पवारांच्या पुण्यातील निवासस्थळी सोमवारी रात्री उशीरा चर्चा झाली आहे. आणि त्यात सुजय विखे पाटील यांच्या नगरच्या उमेदवारीवर तोडगा निघाला आहे असे वृत्त समोर आले होते. मात्र त्या वृत्ताला शरद पवार यांनी पूर्ण विराम दिला आहे.

नगरच्या जागेच्या बाबतीत कोणताच निर्णय झाला नाही. येत्या ७ मार्चला काँग्रेस आघाडीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.त्या बैठकीत नगरच्या जागे वरून पुन्हा नगारा झडण्याची शक्यता आहे. नगरच्या जागवरून मोठी संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. सध्या तरी सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादीकडून नगरसाठी लोकसभेचे उमेदवार असतील या चर्चाना पूर्ण विराम मिळाला आहे.