प्रविण ने प्रमोद को क्यों मारा ?, पूनम महाजनांविरोधात मुंबईत पोस्टरबाजी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान बोलताना भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि मुंबईतील भाजप खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांची तुलना थेट रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत केली त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. इतकेच नव्हे तर पूनम महाजन यांच्या विरोधात मुंबईत राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पूनम महाजन यांच्या वक्तव्यावरून त्यांचा खरपूस  समाचार घेतलाय.

नक्की काय आहे पोस्टर
“अहो चिऊ ताई… महाभारत, रामायण यांचे कथानक राहू द्या, देश की जनता यह जानना चाहती हैं प्रविण ने प्रमोद को क्यों मारा ?” असा मजकूर असलेले पोस्टर मुंबईत ठिकठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लावण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पूनम महाजन यांच्यावर टीका करताना पोस्टर लावून, प्रविण महाजन यांनी प्रमोद महाजन यांना का मारलं?, असा प्रश्न विचारला आहे.

आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार…
एवढेच नाही तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. “आपल्या वडीलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे. तेव्हा आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार… सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही”. अशा प्रकारचे उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर वरून ट्विट केले आहे.

नक्की काय म्हणाल्या होत्या पूनम महाजन
मुंबईत सोमय्या मैदानावर आयोजित भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभ प्रसंगी बोलताना पूनम महाजन म्हणाल्या, ‘शरद पवार हे रामायणातील मंथरा, तर महाभारतातील शकुनी मामा आहेत. सगळ्यांचं ऐकल्याचं दाखवून शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरु करणारे शरद पवारही या महाआघाडीत आहेत. स्वत:ला मिळालं नाही, की इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करणाऱ्या मंथरा आणि शकुनीसारखी पवारांची अवस्था आहे. असे हे सगळे मिळून मोदींच्या विकासरथाला अडवू पाहत आहेत. परंतु महाआघाडीच्या दलदलीत भाजपचं कमळच उमलेल’ असा विश्वास पूनम महाजन यांनी व्यक्त केला.