शरद पवारांच्या जवळचा ‘हा’ नेता सोडणार साथ ?

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपामध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राणा जगजितसिंह यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु झाली असून ते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत जगजितसिंह यांना उस्मानाबाद मधून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांतच ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यातच आज बकरी ईदच्या शुभेच्छा देताना सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या फोटोवर आमदार पदाचा उल्लेख टाळला आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा शहरासह जिल्ह्यात होत आहे.

मागील काही दिवासांपासून राष्ट्रवादीला रामराम ठोकत सत्ताधारी पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी पक्षामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, सचिन आहिर या बड्या नेत्यांनी प्रवेश केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी पक्षातून सत्ताधारी पक्षात गेलेल्या नेत्यांची विधानसभा निवडणुकीत कोंडी करण्याची रणनिती राष्ट्रवादीकडून आखण्यात येत आहे. भाजपाने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी अनेक नेत्यांची कोंडी करून त्यांना आपल्या पक्षात घेतले. याच पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष सोडलेल्या नेत्याची कोंडी करणार असल्याचे बोलले जात आहे.