Rohit Pawar : ‘गुजरातमधल्या 5 वी नापास आमदारासारखं रुग्णांना इंजेक्शन दिलं नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भेट देण्यासाठी गेले असता सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर ठेका धरला. यावरुन विरोधकांनी निशाणा साधत पीपीई कीट न घालता रोहित पवारांनी रुग्णांसोबत डान्स केला. ते शरद पवारांचे नातू आहेत म्हणून त्यांना दुसरा न्याय का ? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांच्या टिकेला रोहित पवार यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

प्रवीण दरेकर यांच्या टीकेला रोहित पवारांनीही ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवार म्हणाले, सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब कोविड सेंटरमधील माणसं माझ्या कुटुंबातील असून त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कमी आहेत. त्यामुळे शक्य ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. त्यांना काल एकच दिवस भेटलो असं नाही तर नेहमीच भेटतो.

रोहित पवार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, माझ्या मतदारसंघातले अधिकारी आणि नागरिकही या रुग्णांची जमेल तशी सेवा करतात. कोविडमुळं खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळं धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटं सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय ? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले, आणि हो… 5 वी नापास झालेल्या गुजरातमधल्या एका आमदारासारखं मी रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही. तसंच आपल्याही पक्षाचे अनेक नेते पीपीई किटशिवाय रुग्णांना भेटले, तेव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचंही काही दिसलं नाही ! असं का ?, अशी विचारणा रोहित पवार यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण ?

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. रोहित पवार यांनी या कोविड सेंटरला सोमवारी (दि.24) भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे यासाठी त्यांनी मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी झिंगाट या गाण्यावर रुग्णांसोबत ठेका धरला होता.