खा. उदयनराजेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कर्जत : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी मराठा आरक्षण प्रलंबित असण्यामागे राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. मराठा समाजाचा अंत अजून किती दिवस पाहणार, असा सवालही त्यांनी केला होता. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील प्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, उदयनराजे नेमकं काय बोलले हे मला माहीत नाही. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र, लाखो लोक गेली कित्येक वर्षे लढत आहेत. त्यामुळे एकमेकांवर टीका करण्याची नाही. एकत्र राहून आरक्षणाच्या बाबतीत मार्ग काढावा लागेल. लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी केवळ मराठा आरक्षणावरच प्रतिक्रिया दिली नाही, तर गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या मतदारसंघात येऊन पडळकर यांनी तुम्ही म्हणताय तसंच बालिशपणाचं, कमी अभ्यास करून वक्तव्य केलं होतं. त्याला मी उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा त्यांनी असंच एक वक्तव्य केलं, ज्याकडे मी दुर्लक्ष केलं आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इतकी वक्तव्यं केली की, त्याच्यात कोण छोटा हेदेखील त्यांनी सांगितलं. त्यांनी आपलं मन आणि जिगर दाखवून दिलं आहे. त्यांच्याइतके मोठे नेते खालच्या पातळीवर येत असतील, तर आम्ही मोठ्याच नेत्याला दुर्लक्ष करत असू तर अशी वक्तव्यं करून मोकळे होतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं पवार यांनी म्हटलं आहे.

पडळकराची योग्यता लोकांनी ठरवावी. एखादं वक्तव्य केल्यानंतर त्यानंतर त्यावर काय प्रतिक्रिया येतात, त्याचा त्यांनी अभ्यास करावा. त्यावरूनच त्यांची योग्यता कळेल. याशिवाय जास्त काही बोलायचं नाही, त्यांनी हा विषय इथेच थांबवला.

काय म्हणाले होते उदयनराजे 
मराठा आरक्षणप्रश्नी उदयनराजेंनी राज्यातील नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नेत्यांवरही तोफ डागली. ते म्हणाले, मी माझ्यावतीनं नाही तर आपल्या पिढीच्या वतीनं आपल्या आगोदरच्या पिढीतील सर्व राजकीय नेत्यांना प्रश्न विचारला आहे की, मराठा समाजाचा प्रश्न तुम्ही प्रलंबित का ठेवला? यासंदर्भात मला विचाराल तर फक्त राजकारणासाठी आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. यावर कुणी खुलासा केलेला नाही, आधीच्या पिढीतील लोकांना आपण मतदान केलं, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा सर्वांना अधिकार आहे.

जोपर्यंत आपण मुळापर्यंत जात नाही. तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. मराठा समाजाचा अंत किती दिवस तुम्ही बघणार आहात. तुम्ही हा प्रश्न सोडवला नाहीत, पण त्याचं उत्तर दिलं पाहिजे. उद्या आपली पिढी आपल्याला जाब विचारेल तेव्हा कुठल्या तोंडानं त्यांना उत्तर द्याल, शरमेनं मान खाली घालावी लागेल. हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला पाहिजे कारण अजूनही तेच सत्तेत आहेत,” अशा शब्दांत उदयनराजेंनी सवाल केला आहे.

You might also like