‘पूछता है भारत’ म्हणत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा, म्हणाले – ‘पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की…’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पुन्हा एकदा रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. लीक झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधील माहितीमुळे गोस्वामी यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये काही मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधाने असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता या चॅटबाबच अजून एक धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. त्यासोबतच अरुण जेटली यांच्या निधनाच्या वृत्तानंतर रिपब्लिक भारत हिंदी टीव्हीत विजयाच्या सेलिब्रेशनसारखं वातावरण होतं, हे या व्हॉट्सअप चॅटमधून सिद्ध होतं आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी “कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!'” असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. “लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या त्या नेत्यांनी सांगावं” असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!'” असं देखील रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी देशाच्या सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती एखाद्या पत्रकाराला कशी काय मिळते? हे अतिशय गंभीर आहे. भाजपाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यापेक्षा पत्रकार अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करणे गरजे आहे, असा टोला रोहित यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना लगावला. बारामती येथे आयोजित कृषि तंत्रज्ञान सप्ताहानंतर रोहित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपाबाबत भाजपाच्या वतीने आंदोलने केले जात आहेत. मुंडेंवर आरोप झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी जाहीरपणे व्यक्त झाले आहेत. एखादा माणूस ज्यावेळेस व्यक्त होतो तेव्हा त्याच्या मनामध्ये खोट नसते. पोलीस प्रशासन त्याबाबत योग्य लक्ष ठेवून आहे. एडीआर रिपोर्ट प्रत्येक आमदार खासदारांसाठी काढला जातो. आज देशभरात आपण बघितलं तर सर्वात जास्त भाजपाच्या आमदार-खासदार यांच्याविरोधात महिला अत्याचाराचे आरोप आहेत.

धनंजय मुंडे यांच्याबाबत भाजपा करत असलेले हे आंदोलन राजकीय हेतूने होत आहे. भाजपाने खरेतर अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे. व राज्य भाजपाने केंद्राला लिखित पत्राद्वारे गोस्वामी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे. गोस्वामीना गोपनीय माहिती तीन दिवस अगोदरच कशी समजते. एवढी मोठी गोपनीय माहिती भाजपाची बाजू घेणाऱ्या पत्रकाराला मिळणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंडे ऐवजी भाजपाने गोस्वामी विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.