…असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल : आ. रोहित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीचे ज्यो बायडन (Joe Biden)यांनी डोनाल्ड ट्रम्प( Donald Trump) यांचा दारूण पराभव केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी ज्यो बायडन यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे, असे ट्विट रोहित पवार (ncp-rohit-pawar-slams-bjp-over-bihar-election) यांनी केले आहे.

अमेरिकेप्रमाणेच बिहारच्या निकालातही असाच बदल दिसेल अशी अपेक्षा आ. पवार यांनी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये सत्तांतर होण्याचे संकेत मिळत असून एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव सर्वात पुढे पाहायला मिळत आहेत. त्यावर देखील पवार यांनी ट्विट केले आहे. राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय असे म्हटले आहे. बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचे एक्झिट पोलवरून दिसत असल्याचे ते म्हणाले.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. काही दिवसांपूर्वी डेमोक्रॅटिक पार्टीच्या ज्यो बायडन यांची पावसातील सभा अमेरिकेत भरपूर गाजली होती. बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला. मात्र या पावसातही बायडन यांनी जोरदार भाषण केले. बायडन यांची रॅली ड्राईव्ह इन होती. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरुन पवार यांनी ट्विटरद्वारे बायडन यांच्या सभेवर भाष्य केले होते.

तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आलेला असतो…
जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो. पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असेच म्हणावे लागले. 2019 ला हे महाराष्ट्राने पाहिलय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे असे ट्विट रोहित पवार यांनी केले होते. काही नेटकऱ्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या 12 वर्षांपूर्वीच्या भाषणाची आठवण झाली. त्यांनी त्याची तुलना करताना बायडन त्या विजयाची पुनरावृत्ती करतील असा विश्वासही व्यक्त केला होता.