‘नेहमीप्रमाणे इथंही भाजपाने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये’ : रोहित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिर, प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली केली (temple-reopening) आहेत. मात्र, कोरोनासंदर्भातील नियमावलीचे पालन करून मंदिरे उघडण्यास परवानगी मिळाल्याने भाविकांसाठी सर्वार्थाने ही दिवाळी भेट ठरली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजपाने नेहमीप्रमाणे इथेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे रोहित पवार ( ncp-rohit-pawar) यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. धार्मिक स्थळ उघडल्याचे श्रेय भाजपा पेढे वाटून घेत आहे. पण योग्य वेळी हा निर्णय घेणार सरकार आणि कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी अध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी, भाविक व जनतेचा हा विजय आहे. भाजपाने नेहमीप्रमाणे इथेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच “राज्यात धार्मिक स्थळं उघडण्यासाठी माझ्यासह इतरांनीही केलेल्या विनंतीनुसार आजपासून ती सुरू झाली आहेत असे देखील त्यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातील विविध मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरु संत श्री. गोदड महाराज, राशीनला जगदंबा देवी आणि सिद्धटेकला गणरायाची भाविक आणि कार्यकर्त्यांसह मनोभावे पूजा आणि आरती केली. धार्मिक स्थळ उघडल्याने या परिसरातील व्यवसायांनाही चालना मिळेल. पण कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकडे कुणीही दुर्लक्ष करू नये, अशी विनंती केली.

पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर, शिर्डी, शेगाव यासह राज्यभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली. प्रत्येक मंदिरात सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग आदी उपाययोजनांची पूर्तताही केली आहे. दर्शनासाठी प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. मंदिरांमध्ये दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग सक्तीचे केले आहे. सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली केली आहेत. त्यानंतर आता दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे.