आ. रोहित पवारांच्या ‘या’ ट्विटची ‘सोशल’वर तुफान चर्चा, म्हणाले – ‘जी भीती होती, ती अखेर खरी ठरली’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा थैमान सुरु असतानाच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच सरकारी कंपन्यांकडून इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे ट्विट सोशल मिडिायावर जोरदार व्हायरल होत आहे. आज केंद्राने इंधन दरवाढ केल्यानंतर रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. जी भीती होती, ती अखेर खरी ठरल्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे.

आमदार रोहित पवार यांनी केलेले ट्विट आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आमदार पवारांनी 2 मे रोजी एक ट्विट केले होते. त्यात 5 राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला महागाईच्या खाईत लोटतात की काय असे वाटत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा जी भीती होती, ती अखेर खरी ठरल्याचे म्हटले आहे.

दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत तब्बल दोन महिन्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी 27 फेब्रुवारीला पेट्रोलच्या दरात 24 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांची वाढ झाली होती. आता दोन महिन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या किंमतीत दिल्लीमध्ये 15 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 18 पैसे प्रती लीटरने वाढ झाली आहे. मंगळवारी दिल्लीच्या बाजारात पेट्रोलचा दर 90.55 रुपये तर डिझेलचा दर 80.91 रुपये झाला होता. देशात निवडणुकांचा काळ असल्याने गेल्या 66 दिवसांत कच्चे तेल महागले तरीही पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ झाली नव्हती.